रत्नागिरी : गुगलवर खासगी वाहन शोधणे रत्नागिरीतील एका ५५ वर्षीय नोकरदाराला चांगलेच महागात पडले आहे. सायबर भामट्यांनी ‘रजिस्ट्रेशन फी’च्या नावाखाली अवघे १४९ रुपये भरण्यास सांगून संबंधित व्यक्तीची तब्बल २ लाख ५१ हजार ८०० रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तक्रारदार विवेक मनमोहन सोन्स (वय ५५, रा. मुलुंड पश्चिम, मुंबई) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १३ मे रोजी फिनोलेक्स फाटा परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवेक सोन्स हे फिनोलेक्स गेस्ट हाऊस ते फिनोलेक्स कंपनी, गोळप या मार्गावर प्रवासासाठी खासगी वाहनाच्या शोधात होते. त्यासाठी त्यांनी गुगलवर शोध घेत ‘ट्रॅव्हलर अँड सेल्फ ड्राईव्ह लक्ष्मी रत्नागिरी’ या नावाने उपलब्ध झालेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. समोरील व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर लिंक पाठवत गाडी बुकिंगसाठी १४९ रुपयांची रजिस्ट्रेशन फी भरण्यास सांगितले. लिंकवर क्लिक करून सोन्स यांनी क्रेडिट कार्डचा १६ अंकी क्रमांक आणि सीव्हीव्ही माहिती भरली. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर मोठ्या रकमेच्या व्यवहाराचे संदेश येऊ लागले. काही वेळाने फोन करून “हा व्यवहार तुमचाच असेल तर १ आणि डिस्प्यूट असेल तर ९ दाबा,” असे सांगण्यात आले. संशय आल्याने त्यांनी ‘९’ हा पर्याय निवडला. मात्र, काही क्षणांतच त्यांच्या क्रेडिट कार्डवरून ‘अॅपल इंडिया’च्या खात्यावर २ लाख ५१ हजार ८०० रुपये वळते झाल्याचा संदेश प्राप्त झाला. पोलिसांनी नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करताना अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचे आणि कार्डची गोपनीय माहिती कोणालाही न देण्याचे आवाहन केले आहे.







