वृत्तसंस्था : पीएफ म्हणजेच प्रोव्हिडंट फंड ही नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी भारत सरकारची महत्त्वाची सामाजिक सुरक्षा योजना मानली जाते. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून दरमहा ठराविक रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते, जी भविष्यात निवृत्तीनंतर आर्थिक आधार म्हणून उपयोगी पडते. मात्र अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या पीएफ खात्यात किती रक्कम जमा झाली आहे, याची माहिती सहजपणे मिळत नाही. यासाठी आतापर्यंत EPFO च्या वेबसाईटवर लॉगिन करून माहिती तपासावी लागत होती. आता मात्र कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच Employees’ Provident Fund Organisation कर्मचाऱ्यांसाठी एक नवे आणि सोपे फीचर घेऊन येत आहे. या सुविधेमुळे आता फक्त WhatsApp वर एक साधा “Hello” मेसेज पाठवून पीएफ बॅलेन्स आणि क्लेम स्टेटसची माहिती मिळवता येणार आहे. ही सेवा २४ तास आणि आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध असणार असल्यामुळे कर्मचाऱ्यांना कोणत्याही वेळी आपला पीएफ तपासता येईल.
या नव्या सुविधेचा वापर करण्यासाठी कर्मचाऱ्यांना EPFO च्या रजिस्टर्ड WhatsApp नंबरवर “Hello” असा मेसेज पाठवावा लागेल. त्यानंतर सिस्टिम संबंधित मोबाईल नंबरची पडताळणी करून तो Universal Account Number म्हणजेच UAN शी लिंक करेल. सिक्युरिटी व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर वापरकर्त्याच्या WhatsApp स्क्रीनवर एक मेन्यू ओपन होईल, ज्यामधून पीएफ बॅलेन्स, क्लेम स्टेटस आणि इतर सेवा निवडता येतील. या सुविधेचे आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे माहिती स्थानिक भाषेतही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मराठीसह विविध भाषांमध्ये सहजपणे माहिती मिळवता येईल. यामुळे वारंवार वेबसाईटवर लॉगिन करण्याची गरज राहणार नाही आणि काही सोप्या स्टेप्समध्ये पीएफशी संबंधित माहिती मिळवणे अधिक सुलभ होणार आहे.







