मुंबई : बेस्ट उपक्रमाने आपल्या सुमारे २५ लाख प्रवाशांसाठी अधिक सुलभ आणि आधुनिक प्रवास अनुभव देण्याच्या उद्देशाने ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’ (ONDC) या प्लॅटफॉर्मवर डिजिटल तिकीट सेवा सुरू केली आहे. या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना मोबाइलच्या मदतीने QR कोडद्वारे तिकीट काढणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे. बसमध्ये चढल्यानंतर तिकीटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज कमी होणार असून, डिजिटल माध्यमातून त्वरित व्यवहार करता येणार आहे. या उपक्रमामुळे सध्याचे १५ ते १६ टक्के असलेले डिजिटल तिकीट वापरकर्ते २५ ते ३० टक्यांपर्यंत वाढतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तिकीट प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी बेस्टकडून सातत्याने प्रयत्न केले जात असून, स्मार्टकार्ड, मोबाइल ॲप्स आणि इतर डिजिटल पर्यायांमुळे महसूल संकलनातही वाढ होत आहे. राज्य सरकारच्या व्यापक डिजिटल धोरणानुसार, मुंबईतील मेट्रो, बेस्ट आणि रेल्वे यांसारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांना एकत्रित डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ONDCशी जोडले जाणे हे बेस्टसाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, भविष्यात प्रवाशांना अधिक एकसंध, जलद आणि तंत्रज्ञानाधारित सेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.






