पुणे : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता दुसरी, तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित अभ्यासक्रम लागू केला जाणार असून, त्याअनुषंगाने संबंधित शिक्षकांचे प्रशिक्षण मे महिन्यात घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे हे प्रशिक्षण उन्हाळी सुटीदरम्यान म्हणजेच ४ मेपासून सुरू होणार असून, सर्व शिक्षकांसाठी ते सक्तीचे असेल. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी)च्या सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी यासंदर्भात सविस्तर परिपत्रक जारी करत प्रशिक्षणाची रूपरेषा स्पष्ट केली आहे. नवीन शैक्षणिक सत्र १५ जूनपासून सुरू होणार असल्याने, त्यापूर्वीच संबंधित शिक्षकांना नव्या अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती आणि प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्य, जिल्हा आणि तालुका या तीन स्तरांवर टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या प्रशिक्षणाच्या वेळापत्रकानुसार, राज्यस्तरावर ४ ते ७ मे दरम्यान मराठी व उर्दू माध्यमातील शिक्षकांना मार्गदर्शन केले जाईल. त्यानंतर ११ ते १४ मे या कालावधीत जिल्हास्तरावर मराठी तसेच इतर माध्यमांच्या शिक्षकांसाठी प्रशिक्षण आयोजित केले जाईल, तर १८ ते ३० मे या दरम्यान तालुकास्तरावर अंतिम टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण केले जाणार आहे. उर्दू माध्यमासाठी मात्र केवळ राज्य व जिल्हास्तरावरच प्रशिक्षणाची व्यवस्था असेल, तर इतर माध्यमांना मराठीसोबत समाविष्ट केले जाणार आहे. राज्यस्तरावर प्रशिक्षक तयार करताना विविध तज्ज्ञ, अनुभवी शिक्षक, अभ्यासक्रम निर्मितीत सहभागी सदस्य आणि पर्यवेक्षकीय अधिकारी यांचा समावेश करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, प्रशिक्षणासाठी आवश्यक सुलभकांची नावे २० एप्रिलपूर्वी सादर करण्याच्या सूचना सर्व संबंधित संस्थांना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार या नव्या अभ्यासक्रमात इयत्ता सहावीचाही समावेश असला, तरी तिचे प्रशिक्षण वेगळ्या टप्प्यात घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहायित शाळांना स्वतंत्रपणे प्रशिक्षण आयोजित करण्याची मुभा असली, तरी त्यासाठी कोणतीही आर्थिक मदत दिली जाणार नसल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.







