पुणे : पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाईची कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत. तसेच, नाल्यांवरील अनधिकृत बांधकामे, आस्थापनांवर कडक कारवाई करावी, असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना दिले. आरोग्य विभागाची आढावा बैठक आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
‘स्वच्छ सर्वेक्षण २०२६’च्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचीही माहिती आयुक्तांनी घेतली. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, अण्णा बोदडे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी बैठकीला उपस्थित होते. ‘पावसाळ्यात शहरातील सखल भागात पाणी साचू नये आणि नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी यंत्रणा अधिक सक्षम करावी. पावसाचेे पाणी साचून ते परिसरातील घर व दुकानांमध्ये शिरते. पावसाळ्यामध्ये शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नाले, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या, चेंबर्स आणि गटार स्वच्छ करावेत. नाल्यांमधील राडारोडा, प्लास्टिक, भंगार व सर्व टाकाऊ साहित्य बाहेर काढावे. ज्याठिकाणी अरुंद नाले आहेत, तिथे यंत्रे जात नाहीत. अशा नाल्यांमध्ये सुरक्षेची सर्व साधने वापरून मनुष्यबळाद्वारे सफाई करावी. नालेसफाईपूर्वीची व नंतरची छायाचित्रे घ्यावीत. नालेसफाईच्या कामाला वेग द्यावा. नालेसफाईचे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण करावे,’ अशा सूचना डॉ. सूर्यवंशी यांनी दिल्या. शहरातील ९४ हजार ९१३ मीटर लांबीच्या १४५ नाल्यांची सफाई सुरू आहे. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील सर्वाधिक ३२.२२ टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले आहे. त्याखालोखाल ‘अ’ २८.२८ टक्के, ‘इ’ २५.६३ टक्के, ‘ब’ २४.६७ टक्के आणि ‘ग’ कार्यालय हद्दीतील २४.३ टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण शहरातील नालेसफाईचे काम २३ टक्के पूर्ण झाले आहे. नाल्यांवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे. नाल्यात राडारोडा टाकू नये. स्वच्छता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांनी कचरा व्यवस्थापनाच्या नियमांचे पालन करावे, असे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले.







