वसई : वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेकडून मोफत बस प्रवास योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या बस पासची मुदत मार्च अखेरीस संपत आहे. मात्र, लगेच नवीन पास देणे शक्य नसल्यामुळे बस पास नूतनीकरणासाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे.
वसई विरार महापालिकेच्या परिवहन सेवेमार्फत ३६ मार्गांवर बसेस चालवल्या जातात. दररोज हजारो प्रवासी या बसेसमधून शहरांतर्गत प्रवास करतात. तर जेष्ठ नागरिक, दिव्यांग, कॅन्सरपिडीत, रक्त शुध्दीकरण करुन घेणाऱ्या नागरिकांना मोफत बस प्रवास योजनेअंतर्गत विशेष सूट दिली जाते. मार्च अखेरीस जुन्या पासची मुदत संपणार असल्याने पालिकेकडून पासचे नूतनीकरण करून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, लाभार्थ्यांना नवीन बस त्वरीत देणे शक्य होणार नसल्याने ३१ मार्चपर्यंत असणाऱ्या बस पासच्या मुदतीस १ महिन्याची म्हणजेच ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश महापौर अजीव पाटील यांनी दिले होते. त्यानुसार आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी मुदतवाढीस मंजूरी दिली आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी मुदतवाढीच्या कालावधीमध्ये नवीन अर्ज भरून नजिकच्या प्रभाग समिती कार्यालयातून पास उपलब्ध करुन घ्यावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.







