पुणे : राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या राज्यभरातील शाळांना उन्हाळी सुट्टी, पुढील शैक्षणिक वर्ष सुरू करण्याबाबतच्या सूचना शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत. त्यानुसार सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना २ मेपासून उन्हाळी सुटी सुरू होणार असून, विदर्भासह सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा १५ जूनला सुरू करण्यात येणार आहेत. प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी या बाबतच्या सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. संपूर्ण राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एकवाक्यता आणि सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केलेल्या आहेत. या अनुषंगाने राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन २०२६ ची उन्हाळी सुट्टी, शैक्षणिक वर्ष २०२६-२७ सुरू करणेबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना २ मे पासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास किंवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा. पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२६-२७ मध्ये विदर्भ, तसेच इतर सर्व विभागातील राज्य मंडळाच्या शाळा १५ जून रोजी सुरू करण्यात याव्यात. जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता १५ जून ते २९ जून या कालावधीत सकाळी ७ ते ११.४५ या वेळेत सुरू करण्यात याव्यात. ३० जूनपासून नियमित वेळेत शाळा सुरू करण्यात याव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे. विदर्भातील तापमान, उन्हामुळे गेल्यावर्षीपर्यंत तेथील शाळा उर्वरित राज्यातील शाळांपेक्षा साधारणपणे आठ ते दहा दिवस विलंबाने सुरू केल्या जात होत्या. मात्र, आता या वेळापत्रकात बदल करून राज्यभरात समानता निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. विदर्भातील शाळा उर्वरित राज्यातील शाळांप्रमाणेच १५ जूनला सुरू होणार आहेत. केवळ तेथे सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याची सवलत देण्यात आली आहे, असे गोसावी यांनी सांगितले.







