अहिल्यानगर : सर्पमित्र म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेला आकाश जाधव हा अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून छत्तीसगड पोलिसांच्या ताब्यातून त्याला मंगळवारी रात्री अहिल्यानगरमध्ये आणण्यात आले. काल बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गांजा तस्करीचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात उघड झालेल्या धक्कादायक माहितीनुसार, जाधव ओडिशा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजा खरेदी करून मध्य प्रदेश व नागपूरमार्गे मालवाहतूक ट्रक आणि रुग्णवाहिकांमधून अहिल्यानगरमध्ये आणत होता. २० जून २०२५ रोजी केडगाव बायपासवर पोलिसांनी छापा टाकत त्याच्या १२ साथीदारांना रंगेहात पकडले होते. मात्र, त्यानंतर जाधव फरार झाला होता. अखेर छत्तीसगडमध्ये तो पोलिसांच्या हाती लागला.
कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने आकाश जाधवला छत्तीसगड पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर काल न्यायालयात हजर करताच त्याची पोलीस कोठडी दोन मार्चपर्यंत मंजूर करण्यात आली. या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून सर्पमित्र या नावाखाली चालणाऱ्या त्याच्या हालचालींवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले होते. आता या रॅकेटमधील इतर आरोपी, आर्थिक व्यवहार आणि आंतरराज्यीय कनेक्शन उघड करण्यासाठी पोलिसांनी चौकशीचा वेग वाढवला आहे. दरम्यान, या प्रकरणातून आणखी मोठे धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुळा नागरदेवळे येथील आकाश जाधव सुरुवातीला विषारी साप पकडणारा सर्पमित्र म्हणून ओळखला जात होता. समाजसेवेच्या नावाखाली प्रसिद्धी मिळविल्यानंतर त्याने झटपट पैसा कमावण्यासाठी गांजाच्या काळ्या धंद्यात उडी घेतली. ओडिशामधील उत्पादन केंद्रांमधून तो मोठ्या प्रमाणात माल आणत असल्याचे समोर आले आहे.







