बारामती : दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपी, गळती आणि गैरप्रकारांना पूर्णविराम देण्यासाठी बारामती तालुक्यात ‘हायटेक डिजिटल जीपीएस-लॉक पेट्यां’चा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येत आहे. हा केवळ स्थानिक प्रयोग न राहता ‘बारामती पॅटर्न’ म्हणून ओळख निर्माण होणार आहे. तालुक्यातील २९ परीक्षा केंद्रांवर ही अत्याधुनिक प्रणाली बसविण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी हा प्रयोग महत्त्वाचा मानला जात आहे.
बारामती तालुक्यात २९ परीक्षा केंद्रे आहेत. प्रत्येक केंद्रावर १७,२०० विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षेच्या या नव्या व्यवस्थेनुसार प्रश्नपत्रिका ठेवलेल्या डिजिटल पेट्या फक्त नियुक्त परीक्षा केंद्रावर आणि ठरलेल्या वेळेलाच उघडतील. जीपीएस प्रणालीद्वारे पेट्यांचे थेट निरीक्षण केले जाते. आर. एन. अगरवाल टेक्निकल हायस्कूल येथून पुढे प्रश्नपत्रिका केंद्रापर्यंत ठराविक ठिकाणाबाहेर पेटी उघडण्याचा प्रयत्न झाल्यास तात्काळ इशारा मिळतो. त्यामुळे प्रश्नपत्रिका गळतीसारख्या प्रकारांना आळा बसणार आहे. कॉपीप्रवण आणि संवेदनशील केंद्रांवर भरारी पथके, सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच अतिरिक्त प्रशासकीय देखरेख ठेवण्यात आली आहे. बारामतीत राबवला जाणारा जीपीएस-लॉक डिजिटल पेट्यांचा पायलट प्रोजेक्ट ‘बारामती पॅटर्न’ म्हणून ओळख निर्माण होणार आहे. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित वितरणासाठी लोकेशन-लॉक तंत्रज्ञान, थेट जीपीएस-लॉक ट्रॅकिंग, तसेच भरारी पथके व सीसीटीव्हीच्या संयुक्त देखरेखीची त्रिसूत्री ही परीक्षा व्यवस्थापनातील नवी दिशा मानली जाणार आहे.







