मुंबई : मुंबईत पहिल्यांदाच १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मुंबई क्लायमेट वीक (एमसीडब्लू) चे आयोजन करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या उपक्रमादरम्यान मुंबई हे ग्लोबल साऊथमधील हवामान नेतृत्वाचे प्रमुख व्यासपीठ ठरणार आहे. या काळात भारत आणि जगभरातील सरकारप्रमुख, उद्योगजगतातील नेते, हवामान क्षेत्रातील नवोन्मेषक, दानशूर संस्था, युवक तसेच स्थानिक समुदायांचे प्रतिनिधी एकत्र येऊन हवामान विषयक चर्चेपासून प्रत्यक्ष कृतीकडे वाटचाल करतील. मुंबई क्लायमेट वीकचे आयोजन जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे असलेल्या मध्यवर्ती केंद्रामार्फत करण्यात येणार असून, त्याचबरोबर शहरभर विविध शैक्षणिक संस्था, वसाहती आणि सांस्कृतिक ठिकाणी कार्यक्रमांचे जाळे उभारण्यात येणार आहे. या उपक्रमांमधून प्रत्यक्ष अंमलात आणता येतील अशा हवामान उपाययोजनांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. हवामानावरील ही जागतिक पातळीवरील चर्चा पुरस्कारप्राप्त स्वयंसेवी संस्था प्रोजेक्ट मुंबई यांच्या नेतृत्वाखाली होत असून, महाराष्ट्र शासन, पर्यावरण व हवामान बदल विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे या सप्ताहास सहकार्य लाभले आहे. या उपक्रमामुळे मुंबईला भारत तसेच इतर ग्लोबल साऊथमधील शहरांसाठी हवामान उपाययोजनांची ‘लाईव्ह टेस्ट बेड’ म्हणून स्थान दिले जात आहे.
मुंबई क्लायमेट वीकविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुंबई क्लायमेट वीकद्वारे हवामान बदलावर कृती करण्याचा भारताचा ठाम निर्धार शहर पातळीपासून जागतिक स्तरापर्यंत अधोरेखित होतो. भारत आणि जगभरातील सरकारे, उद्योग, वित्तसंस्था, तज्ज्ञ आणि युवक मुंबईत एकत्र येत असताना, महाराष्ट्र आपल्या नागरिकांसाठी आणि ग्लोबल साऊथमधील देशांसाठी अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सक्षम भविष्यासाठी सर्व भागीदारांसोबत काम करण्यास तयार आहे, असा स्पष्ट संदेश यातून दिला जात आहे.” प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक शिशिर जोशी म्हणाले, “मुंबई ही नेहमीच जिद्द आणि कल्पकतेसाठी ओळखली जाणारी नगरी आहे आणि मुंबई क्लायमेट वीकमध्ये हीच ऊर्जा हवामान संकटाशी मोठ्या प्रमाणावर भिडताना दिसेल. ही भारतातील पहिली अशा स्तरावरील नागरिकांच्या नेतृत्वाखालील हवामान चळवळ आहे, जिथे मंत्री, उद्योगजगतातील नेते आणि तज्ज्ञ हे विद्यार्थी, प्रत्यक्ष काम करणारे कर्मचारी आणि परिसरातील स्वयंसेवक यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर सहभागी होतील. यामुळे ग्लोबल साऊथमधील हवामान नेतृत्व प्रत्यक्षात कसे असते, हे मुंबई दाखवून देईल.” मुंबई क्लायमेट वीकचे आयोजन हब-अँड-स्पोक मॉडेलद्वारे करण्यात येत आहे. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे तीन दिवसांचा मुख्य कार्यक्रम होणार असून, त्यात नेतृत्व संवाद, विविध विषयांवरील ट्रॅक्स, एमसीडब्लू इनोव्हेशन चॅलेंज, यूथ ग्रीन इनोव्हेशन चॅलेंज तसेच उपाययोजनांचे प्रदर्शन क्षेत्र असणार आहे. मुख्य केंद्रातील पहिल्या दिवशी अर्थशॉट प्राईज या आंतरराष्ट्रीय उपक्रमाचे विशेष सत्र होणार असून, या सत्रात निसर्ग, अन्न प्रणाली आणि मानव यांवर लक्ष केंद्रित केले जाईल. केन्सिंग्टन पॅलेस (यूके) येथील नेतृत्व पथकाच्या मार्गदर्शनाखाली होणारा हा उपक्रम प्रिन्स विल्यम यांच्या संकल्पनेतून साकारलेला असून, मुंबई क्लायमेट वीकमध्ये तो प्रथमच आणि विशेष स्वरूपात सादर केला जाणार आहे. या कार्यक्रमात ग्लोबल साऊथमधील हवामान नवोन्मेषक, प्रत्यक्ष उपाययोजना राबवणारे कार्यकर्ते तसेच भारतातील अग्रगण्य व्यक्ती सहभागी होणार असून, मोठ्या प्रमाणावर जनसहभाग वाढवण्याचा उद्देश आहे. याच कालावधीत विविध महाविद्यालये, वसाहती आणि सांस्कृतिक संस्थांमध्ये स्पोक कार्यक्रम सुरू असून, त्यात रोड शो, कला व माध्यम उपक्रम तसेच सस्टेनेबिलिटी मेला यांचा समावेश आहे. या उपक्रमांद्वारे हवामान कृती दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. 18 फेब्रुवारी रोजी विशेष सत्रात भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा आणि अंतराळवीर शुभांशु शुक्ला (दोघेही अशोक चक्र पुरस्कारप्राप्त) शालेय विद्यार्थ्यांशी तसेच जागतिक नेतृत्वाशी संवाद साधणार असून, अंतराळ संशोधन, विज्ञान आणि हवामान जबाबदारी यांचा परस्पर संबंध अधोरेखित केला जाणार आहे.
मुंबई क्लायमेट वीक व्यापक भागीदारीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक हा मुख्य भागीदार आहे. डेलॉईट ही धोरणात्मक ज्ञान भागीदार संस्था आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस आणि आयआयटी बॉम्बे हे शैक्षणिक भागीदार आहेत. वातावरण हे मुंबई क्लायमेट वीकचे नागरिक संवाद व्यासपीठ असून, याद्वारे नागरिकांना त्यांच्या हवामानविषयक मतांची मुक्त आणि अनफिल्टर्ड मांडणी करता येणार आहे. भाषणे, कविता, कथा, गाणी आणि इतर सर्जनशील माध्यमांद्वारे हवामानाशी संबंधित दैनंदिन अनुभव आणि भावना मुंबई क्लायमेट वीकच्या केंद्रस्थानी आणल्या जाणार आहेत. एव्हरसोर्स कॅपिटल, इंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्ह, शक्ती सस्टेनेबल एनर्जी फाउंडेशन, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया, क्लायमेट ग्रुप, C४०, महिंद्रा ग्रुप, इंडियन मर्चंट्स चेंबर यांसारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांचा सहभाग असणार आहे. युनिसेफच्या युवाह (YuWaah!) या उपक्रमाद्वारे युवक सहभाग भागीदार असणार आहे. याशिवाय ३०हून अधिक देशांतील प्रतिनिधी, केंद्र व राज्य सरकारांचे नेते, बहुपक्षीय संस्था, वित्तसंस्था, उद्योग, दानशूर संस्था, नागरी समाज, शैक्षणिक क्षेत्र आणि युवक नेटवर्क्स यांचा सहभाग अपेक्षित आहे. या परिषदेचे यश निधी मिळालेल्या उपाययोजना, तयार झालेल्या भागीदाऱ्या, प्रभावित धोरणे आणि सशक्त झालेल्या समुदायांद्वारे मोजले जाणार आहे. मुंबई क्लायमेट वीकमध्ये हवामान धोरण, वित्त, उद्योग आणि नागरी समाजातील आंतरराष्ट्रीय व भारतीय नेतृत्व सहभागी होणार आहे. आंतरराष्ट्रीय वक्त्यांमध्ये हिलरी क्लिंटन, बिल गेट्स, रॉकीफेलर फाउंडेशनचे प्रतिनिधी राजीव शाह, आयएफसी (वर्ल्ड बँक समूह) दक्षिण आशियाचे प्रादेशिक संचालक इमाद फखुरी, एन्व्हायर्नमेंटल डिफेन्स फंडच्या कार्यकारी संचालक अमांडा लेलँड आणि अलाइड क्लायमेट पार्टनर्सच्या वरिष्ठ सल्लागार क्लॅरिसा डी फ्रँको यांचा समावेश आहे. भारतीय सार्वजनिक क्षेत्रातून केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शहर आणि प्रादेशिक नेतृत्वाचाही सहभाग असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण सचिव जयश्री भोज, परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव डॉ. अक्विनो विमल तसेच केंद्र शासनाचे माजी सचिव सी. के. मिश्रा यांचाही सहभाग राहणार आहे. उद्योग व वित्त क्षेत्रातून अमित चंद्रा (बेन कॅपिटल), अंकुर गुप्ता (ब्रुकफिल्ड), व्ही. वैद्यनाथन (आयडीएफसी बँक), जामशेद गोदरेज, नादिर गोदरेज, अंजली रवीकुमार (झोमॅटो), प्रतीक अग्रवाल (सेरेंटिका रिन्युएबल्स) आणि समीर सिसोदिया (रेनमॅटर फाउंडेशन) सहभागी होणार आहेत. दानशूर आणि ज्ञान परिसंस्थेचे प्रतिनिधित्व रोहिणी निलेकणी, सौम्या स्वामिनाथन, मनोज कुमार, सत्यजित भटकळ, मृदुला रमेश, सीमा पॉल, शिशिर सिन्हा, डॉ. वीणा श्रीनिवासन आणि इतर संशोधन व प्रभाव क्षेत्रातील नेते करतील. पर्यावरण विषयासाठी काम करणाऱ्या भारतीय चित्रपटसृष्टीतील व्यक्तींमध्ये दिया मिर्झा आणि भूमी पेडणेकर यांचा सहभाग असेल. मुंबई क्लायमेट वीकचा कार्यक्रम अन्न प्रणाली, ऊर्जा संक्रमण आणि शहरी लवचिकता या तीन मुख्य स्तंभांवर आधारित आहे. अन्न प्रणाली स्तंभाचे नेतृत्व इंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्ह करत असून, ऊर्जा संक्रमणासाठी शक्ती सस्टेनेबल एनर्जी फाउंडेशन, एव्हरसोर्स कॅपिटल आणि आयएसईजी फाउंडेशन यांचे सहकार्य आहे. शहरी लवचिकता विषयाचे नेतृत्व वारी (डब्लूआरआय) इंडिया करत असून, एचटी पारेख फाउंडेशन आणि इंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्ह हे विषय भागीदार आहेत. मुंबई क्लायमेट वीक ही भारत आणि ग्लोबल साऊथच्या नेतृत्वाखालील, नागरिक-केंद्रित हवामान कृतीचे नवे मॉडेल ठरणार आहे. सार्वजनिक–खासगी–नागरिक भागीदारीवर आधारित आणि हब-अँड-स्पोक रचनेतून राबवली जाणारी ही परिषद दरवर्षी आयोजित करून, प्रगतीचा आढावा घेणे, यशस्वी उपक्रमांचा विस्तार करणे आणि मुंबईतून भारत व ग्लोबल साऊथसाठी पुढील पिढीच्या हवामान उपाययोजना विकसित करण्याचा उद्देश आहे.







