पुणे : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे महाशिवरात्रीला दर्शनासाठी जाण्याचे नियोजन करणाऱ्या शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे यंदा महाशिवरात्रीच्या दिवशी भीमाशंकर मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. तसेच १२ ते १८ फेब्रुवारी या कालावधीतही मंदिर पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
सध्या मंदिरात डागडुजी व दुरुस्तीची कामे सुरू असून, भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महाशिवरात्रीला दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत मंदिर प्रशासनाकडून भाविकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. भीमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत मंदिर परिसरात भव्य सभामंडप उभारणी, पायरी मार्गाचे बांधकाम आणि परिसर सुशोभीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य, लोखंडी सळ्या आणि अवजड यंत्रसामग्री मंदिर परिसरात ठेवण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. अशा गर्दीत या साहित्यामुळे सुरक्षेचा धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.







