मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज (३१ जानेवारी) शपथ घेतली. राज्याचे प्रभारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे काही प्रमुख नेते उपस्थित होते. अतिशय भावपूर्ण वातावरणात हा शपथविधी पार पडला. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचा आगमन झाल्यानंतर उपस्थित आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ‘अजित दादा अमर रहे’, ‘एकच वादा अजित दादा’, ‘वहिनी आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘महाराष्ट्राचा एकच दादा, अजित दादा’ अशा घोषणा दिल्या.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली. त्यामुळं महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे सर्व आमदार व प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. यानंतर सायंकाळी ५ वाजता त्यांचा शपथविधी पार पडला. विधानभवनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी मांडला, तर दिलीप वळसे-पाटील यांनी त्यास अनुमोदन दिलं. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची एकमतानं राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली. या निवडीची अधिकृत माहिती विधिमंडळ सचिवांना कळवण्यात आली. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला. सुनेत्रा पवार यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सीपी राधाकृष्णन यांच्याकडे राजीनामा सोपवला. सुनेत्रा पवार यांनी २०२४ची लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली होती. मात्र, आता राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्यामुळं त्यांना खासदारकीचा राजीनामा द्यावा लागला आहे.







