मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले. विमान अपघातात निधन झाल्यानंतर महाराष्ट्रात शोककला पसरली आहे. आता त्यांच्यावर गुरुवारी बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार दरम्यान ‘एकच वादा अजित दादा’ अशा घोषणा देत नेते, कार्यकर्ते, सर्वसामान्य माणूस भावुक झाल्याचे यावेळी दिसले. ‘महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री’ अजित पवार यांच्या अचानक जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. आता अजित पवार यांच्या निधनानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक स्टार्सनं त्यांना श्रद्धांजली वाहिली आहेत. आता मराठी चित्रपट ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’बद्दल एक माहिती समोर आली आहे.
‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्या निधनामुळं चित्रपटाची रिलीज डेट पुढं ढकलत येत असल्याचं सांगितलं आहे. अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट खूप दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाला पाहण्यासाठी अनेकजण आतुर आहेत. या चित्रपटामध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संजय नार्वेकर, संकेत पाठक आणि समृद्धी केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे निर्माते पुष्कर यावलकर, स्वाती खोपकर, उषा काकडे, सुधीर कोलते आणि निनाद नंदकुमार बत्तीन हे आहेत. दरम्यान ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपटाच्या टीमनं शेअर केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिलं आहे की, ‘महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री, माननीय अजितदादा पवार यांच्या अकाली जाण्यानं संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. हा धक्का अत्यंत वेदनादायी असून प्रत्येक मराठी मन आज हळहळत आहे. या दुःखद प्रसंगी आम्हीही या शोकभावनेत सहभागी आहोत. त्यामुळेच संवेदनशीलतेची जाणीव ठेवत, आमच्या ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.’ या कठीण क्षणी माननीय अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत, त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि समस्त महाराष्ट्राप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो. टीम ‘पुन्हा एकदा साडे माडे 3.’ आता हा चित्रपट कधी रिलीज होणार, हे अद्याप जाहीर झालेले नाही. याशिवाय दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘रणपति शिवराज स्वारी आग्रा’ची देखील रिलीज तारीख पुढं ढकलण्यात आली आहे. हा चित्रपट आता ६ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान ‘रणपति शिवराज स्वारी आग्रा’ आणि ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या दोन्ही चित्रपटांमध्ये ३० जानेवारी २०२६ या एकाच रिलीज डेटवरुन वाद निर्माण झाला होता. आता दोन्ही चित्रपटांची रिलीज तारीख बदलविण्यात आली आहे.







