वृत्तसंस्था : भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आजपासून पुढील ३ महिन्यांसाठी तात्पुरते बंद ठेवण्यात आले आहे. मंदिर परिसरातील विकासकामे, सभामंडप आणि पायरी मार्गाचे बांधकाम नियोजनबद्ध व सुरक्षित पद्धतीने पूर्ण करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. देवस्थान ट्रस्ट, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक घटकांच्या एकमताने हा निर्णय जाहीर करण्यात आला. पण तुम्हाला माहित आहे का? तीन महिन्यांसाठी बंद असणारं हे प्राचिन मंदिर एका विशेष देवदर्शन मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू होणार असल्याने अपघाताचा धोका टाळण्यासाठी दर्शन तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. ९ जानेवारी २०२६ पासून पुढील ३ महिने मंदिर दर्शनासाठी बंद राहणार आहे. मात्र एका दिवशी भाविकांसाठी विशेष सवलत देण्यात येणार आहे. मंदिर दर्शन बंद असले तरी नित्य पूजा, आरती आणि धार्मिक विधी परंपरेनुसार सुरू राहतील. मात्र भाविकांना प्रत्यक्ष दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार नाही.
भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये सभामंडप, प्रवेश-निर्गमन मार्ग आणि इतर सुविधा उभारल्या जाणार आहेत. २०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कामे वेळेत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भविष्यात लाखो भाविक येण्याची शक्यता आहे. मंदिर परिसराच्या विकासासाठी सुमारे २८८.१७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामधून दीर्घकालीन सुरक्षितता आणि सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. मंदिर परिसरात कोणतीही अनधिकृत ये-जा होऊ नये यासाठी सर्व रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अधिकृत कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांनाच प्रवेश दिला जाणार आहे. भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन १२ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार आहे. या दिवसांत आवश्यक सुरक्षा व्यवस्था असणार आहे.







