पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ म्हणजेच पीएमपीकडून रिल्स स्टार इंफ्ल्यूएनसर अथर्व सुदामे याला तिसरी नोटीस जारी करण्यात आली आहे. याआधी पीएमपीकडून दोन नोटीस जारी करुन आपली लेखी भूमिका मांडण्याची संधी देण्यात आली होती. पण अथर्वकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आता पीएमपी प्रशासनानेदेखील आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळत आहे. अथर्व सुदामे हा प्रसिद्ध रिल्सस्टार आहे. त्याने पीएमपीच्या बसमध्ये कंडक्टरच्या पोशाखात एक रिल तयार केला होता. संबंधित रिल त्याने सोशल मीडियावर शेअर केलं होतं. या रिलचा हेतू हा मनोरंजन इतकाच होता. पण आपण काय आणि कुठे करतोय? याचं भान आपल्याला असायला हवं. कारण पएमपीच्या मालमत्तेचा वापर करताना पीएमपी प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते, असं प्रशासनाचं म्हणणं आहे.
संबंधित रिल्समध्ये प्रवाशांना आक्षेपार्ह आणि अपमानजनक दाखवण्यात आल्याचा आरोप पीएमपीकडून करण्यात आला आहे. आता याच प्रकरणी पीएमपीने अथर्व सुदामे याला ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. फक्त एवढंच नाही तर दंड जमा करा अन्यथा माहिती तंत्रज्ञान कायद्यानंतर्गत गुन्हा दाखल करणार असा इशारा पीएमपी प्रशासनाने दिल्याची देखील माहिती समोर येत आहे. “आपण पुणे महानगर परिवहन महमहामंडळाच्या मालकीच्या बसमध्ये चित्रीकरण, महामंडळाचा गणवेश, ई मशिन आणि बॅच बिल्ला याचा बेकायदेशीर वापर करुन, परिवहन महामंडळाचे कोणतीही पूर्वपरवानगी न घेता इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड आणि प्रसारित केला. या प्रकरणी आपल्याला ०२/०१/२०२६ रोजी नोटीस बजावण्यात आलेली होती. आपणास सदरील नोटीस प्राप्त दिनांकापासून सात दिवसांच्या आत लेखी खुलासा पुणे महानगर परिवहन महामंडळ, मुख्य कार्यालय, शंकरशेठ रोड, स्वारगेट, पुणे ४११०३७ येथे सादर करणेबाबत सुचित केले होते”, असं नोटीसमध्ये म्हटलं आहे.







