मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग वाहतूक महामंडळ म्हणजेच एसटीमध्ये लवकरच १७ हजार ४५० ड्रायव्हर आणि मदतनीसांच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार आहेत. ही भरती भविष्यात येणाऱ्या ८ हजार नव्या बसगाड्यांसाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवण्यासाठी आहे. परिवहन मंत्री आणि एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. यामुळे एसटीच्या सेवेत सुधारणा होऊन अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.
एसटीकडे बसगाड्यांची संख्या वाढत असल्याने, चालक आणि मदतनीसांची कमतरता जाणवत आहे. नव्या बससाठी मनुष्यबळ नसल्यास सेवांवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच ही मोठी भरती करण्यात येत आहे. यामुळे बससेवा सुरळीत चालून प्रवाशांना चांगली सुविधा मिळणार आहे. याद्वारे मनुष्यबळ मिळाल्याने एसटीची क्षमता वाढेल, असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केलाय. ही भरती ई-निविदा पद्धतीने राबवली जाणार असून २ ऑक्टोबरपासून निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. एसटीच्या संचालक मंडळाच्या अलीकडील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ही मेगा भरती ३ वर्षांच्या कालावधीसाठी असेल आणि भाडेतत्त्वावर मनुष्यबळ घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागांनुसार होईल, जेणेकरून सर्व भागांत समान वाटप होईल. नवीन भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना किमान ३० हजार रुपये मासिक वेतन मिळेल. याशिवाय एसटी महामंडळाकडून त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. मनुष्यबळ पुरवणाऱ्या संस्थांकडून हे कर्मचारी उपलब्ध होतील आणि वेळेवर कामाला लागतील. यामुळे कर्मचाऱ्यांची कौशल्ये वाढतील आणि ते अधिक कार्यक्षम होतील.







