नाशिक : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या असून शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दोन्ही बंधू तब्बल दोन दशकांनंतर एकत्र आले आहेत. दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये होत असलेल्या जाहीर सभेत दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावरून विरोधकांवर तोफ डागणार आहे. या सभेत ठाकरे बंधू काय बोलणार? याकडे सर्व नाशिककरांचे लक्ष लागलं आहे.
राजकीय मतभेद बाजूला ठेऊन तब्बल दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकत्र आल्यानं दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे. नाशिक हे दोन्ही नेत्यांसाठी जिव्हाळ्याचा गड राहिला आहे. त्यामुळं नाशिक शहरातून ठाकरे बंधूंच्या युतीच्या प्रचाराचा श्री गणेश होणार आहे.या सभेच्या निमित्तानं ९ जानेवारी रोजी नाशिकमधून ठाकरे बंधू विरोधकांवर पहिली तोफ डागणार आहेत. नाशिकच्या सभेनंतर राज्यात विविध भागात दोन्ही नेत्यांच्या संयुक्त सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. राज्यात एकूण सात ठिकाणी या सभेचे नियोजन करण्यात आलं आहे. तर नाशिकच्या सभेचे ठाकरे बंधू काय बोलणार? याकडे दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले. उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची संयुक्त सहभाग ९ जानेवारीला झाल्यानंतर शिवसेनेकडून १२ जानेवारीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचं नियोजन करण्यात आलं आहे. नाशिक महानगरपालिकेत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात युती असून भाजपा स्वबळावर लढत आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा) आणि मनसे एकत्रित निवडणुकीला सामोरे जातं आहेत.






