मुंबई : अनेक वर्षांपासून गूगल आपल्या वापरकर्त्यांना थर्ड-पार्टी ईमेल सेवेचा वापर करत असल्यास त्यांचा अकाउंट ईमेल पत्ता बदलण्याची परवानगी देत होतं, पण @gmail.com असलेल्या पत्त्यांसाठी ही सुविधा उपलब्ध नव्हती. आता ही मर्यादा संपुष्टात येत आहे. गूगलच्या सपोर्ट पेजवर एक नवीन प्रक्रिया सांगितली जात आहे, जी “हळूहळू सर्व वापरकर्त्यांसाठी रोल आउट होत आहे”.
सध्या हे अपडेट फक्त हिंदी भाषेतील सपोर्ट पेजवर दिसत आहे, इंग्रजी वापरकर्त्यांना अजून दिसत नाही. हे बदल प्रथम “Google Pixel Hub” टेलिग्राम ग्रुपमध्ये आढळलंय. इतर ईमेल प्रदाते जसं की प्रोटॉन मेल आणि आउटलुक यांनी वापरकर्त्यांना ईमेल एलियास बदलण्याची सुविधा दिली आहे, परंतु गुगलनं यापूर्वी ही सुविधा उपलब्ध केली नव्हती. एका गुगल सपोर्ट दस्तऐवजातून ही माहिती समोर आली आहे, ज्यात जीमेल पत्ता बदलण्याची प्रक्रिया उघड करण्यात आली आहे. गूगलच्या मते, आता वापरकर्ते त्यांचा @gmail.com ईमेल पत्ता दुसऱ्या नवीन @gmail.com पत्त्यानं बदलू शकतील. जुन्या पत्त्यावर येणारे ईमेल नव्या इनबॉक्समध्ये येतील आणि लॉगिनसाठीही तो वापरता येईल. अकाउंटमधील फोटो, मेसेजेस, ईमेल्स यासारखा डेटा काहीही प्रभावित होणार नाही.
मर्यादा आणि नियम
- बदल केल्यानंतर 12 महिन्यांपर्यंत नवीन पत्ता बदलता किंवा डिलीट करता येणार नाही.
- जुना पत्ता पुन्हा वापरता येईल, पण नवं अकाउंट त्यानं बनवता येणार नाही.
- एका अकाउंटमध्ये फक्त 3 वेळा बदल करता येतील, म्हणजे एकूण ४ पत्ते.
- जुना पत्ता कायम तुमचाच राहील, दुसऱ्या कोणाला मिळणार नाही.







