मुंबई : मुंबई पोलीस दलातील शिपाई आणि उपनिरीक्षकांनाही आता किमान ५३८ चौरस फुटाची सदनिका सेवानिवासस्थान म्हणून मिळणार आहे. याबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पाठविलेला प्रस्ताव राज्य शासनाने मान्य केला आहे. त्यानुसार शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुंबई पोलीस दलात ४० हजारहून अधिक पोलीस शिपाई आहेत. या प्रत्येकाला सेवानिवासस्थान मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळामार्फत इमारती उभारल्या जात आहेत. आतापर्यंत पोलीस उपनिरीक्षक ते शिपाई या वर्गातील पोलिसांना ४५ चौरस मीटर म्हणजेच ४८४ चौरस फुटाची सदनिका लागू होती. याशिवाय याच वर्गातील पोलिसांना राज्यात ५० चौरस मीटर म्हणजे ५३८ चौरस फुटाची सदनिका लागू होती. हा बदल रद्द करुन मुंबई पोलिसांनाही ५० मीटर आकाराची सदनिका सेवानिवासस्थान म्हणून उपलब्ध करुन द्यावी, असा प्रस्ताव पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पाठविला होता. हा प्रस्ताव मंजूर झाल्याने आता शिपाई ते उपनिरीक्षक हे ५३८ चौरस फुटाच्या सेवानिवासासाठी पात्र ठरणार आहेत.
पोलिसांसाठी आवश्यक सेवानिवासस्थाने उपलब्ध नाहीत. त्यामुळे अनेक पोलिसांना कर्जत, कसारा, कल्याण, विरार-पालघर येथून कर्तव्यावर यावे लागते. ज्या पोलिसांना सेवानिवासस्थाने मिळाली आहेत, ती १८० ते २२० चौरस फुटाची आहेत. या पैकी अनेक सेवानिवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. काही इमारती मोडकळीस आल्याने रिक्त करण्यात आल्या आहेत. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इमारती बांधल्या जात होत्या. परंतु या इमारतींचा दुरवस्था पाहता पोलिसांसाठी सेवानिवासस्थाने बांधण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळावर सोपविण्यात आली. या मंडळाने आतापर्यंत राज्यातील पोलिसांसाठी ३८ हजार घरे बांधली आहेत. पोलिसांसाठी मोठी घरे असावीत यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळांचे तत्कालीन महासंचालक अरुप पटनाईक यांनी शिपाई व उपनिरीक्षकांसाठी ५०० चौरस फुटाची घरे वरळी येथे बांधली होती. त्यानंतर मुंबईतील पोलिसांच्या मालकीचे ३८ भूखंड निवडण्यात आले असून त्यावर पोलीस शिपायांसाठी इमारती बांधण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.या प्रकल्पासाठी राज्य शासनाने महामंडळाचा २४८ कोटी मंजूर केले आहेत. याशिवाय म्हाडा भूखंडावर असलेल्या पोलिसांच्या विविध वसाहतींचा पुनर्विकास प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.







