वृत्तसंस्था : युनायडेट स्टेट्समध्ये पर्यटनासाठी जाणाऱ्यां प्रवाशांना देखील त्यांच्या पाच वर्षाची सोशल मीडिया हिस्ट्री सादर करावी लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील ट्रम्प प्रशासन युकेसह जवळपास १२ देशांतील नागरिकांसाठी हा नवा नियम करण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे असल्याची माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हा नियम १२ देशातील त्या नागरिकांना लागू होण्याची शक्यता आहे जे नागरिक ९० दिवसांच्या व्हिसाशिवाय अमेरिकेला भेट देणार आहेत. त्यांना अमेरिकेत प्रवेशापूर्वी त्यांना त्यांची पाच वर्षाच्या सोशल मीडिया हिस्ट्री सादर करायला सांगितली जाऊ शकते. जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत तेव्हापासून ते दुसऱ्या देशातून येणाऱ्या नागरिकांबाबत अत्यंत कडक भूमिका घेत आहेत. ते राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत अनेक नवे अन् कडक नियम लागू करत आहेत. विश्लेषकांच्या मते डोनाल्ड ट्रम्प यांची ही नवी योजना संभाव्य पर्यटकांसाठी मोठा अडसर ठरणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या डिजीटल अधिकारांना देखील ठेच पोहचणार आहे. यामुळे अमेरिकेतील पर्यटनात मोठी घट होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मते ही काळजीची गोष्ट नाही.







