मुंबई : मुलुंड येथील कचराभूमीवरील कचऱ्याचे ढीग हटवून जमीन प्राप्त करण्याचा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नसताना या मैदानावर गोल्फ खेळाचे मैदान तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी याबाबतची मागणी केली होती. त्यानुसार या जमिनीवर गोल्फचे मैदान तयार करता येईल का याबाबतचा व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया या संस्थेला परवानगी दिली आहे.
मुंबई महापालिकेच्या मुलुंड येथील कचराभूमीची क्षमता संपल्यामुळे या कचराभूमीवर कचऱ्याचे ढीग शास्त्रोक्त पद्धतीने हटवून जमीन पुनर्प्राप्त करण्याचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाचे अद्याप ६८ टक्के काम झाले आहे. या प्रकल्पातून मिळणाऱ्या जमिनीवर गोल्फ खेळाचे मैदान सुरू करावे अशी मागणी आमदार मिहीर कोटेचा यांनी केली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेने बुधवार १० डिसेंबर रोजी प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया (PGTI) यांना मुलुंड कचराभूमी येथे गोल्फ कोर्सचा व्यवहार्यता अभ्यासासाठी (feasibility study) परवानगी दिली आहे. स्थानिक भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी याबाबत म्हटले आहे की, गोल्फ मैदान या ठिकाणी सुरू झाल्यास मुलुंडच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार असून आर्थिक विकास होण्याबरोबरच जुन्या इमारती आणि वसाहतींच्या पुनर्विकासाचाही मार्ग सुकर होणार आहे. अनेक वर्षे मुलुंड पूर्वेतील नागरिकांना या डंपिंग ग्राऊंडमुळे येणाऱ्या दुर्गंधीचा सामना करावा लागला. मुलुंड कचराभूमीवरून कचरा हटवल्यानंतर मुलुंडकरांना शुद्ध हवा मिळेल.







