शिर्डी : लाखो भाविकांचं शिर्डी हे श्रद्धास्थान. साईंच्या चरणी दररोज हजारो भाविक लीन होतात. मात्र आता याच शिर्डीत अगदी अमर अकबर अँथनी चित्रपटातील सीन प्रत्यक्षात आला आहे .तिथे जशी निरुपमा रॉयला दृष्टी येते. अगदी तसाच चमत्कार साईबाबांच्या दर्शनाने झाल्याचा दावा उत्तराखंडमधील कुटुंबाने केलाय. १० वर्षाच्या अंध मुलाला जन्मापासून एका डोळ्यानं दिसत नव्हतं. मात्र साईबाबांच्या दर्शनाने दृष्टी आल्याचा दावा त्याच्या कुटुंबियानं केलाय.
उत्तराखंडमधील कुटुंबाच्या दाव्यानंतर खळबळ उडाली असतानाच हा साईबाबांचा चमत्कार असल्याचा दावा विश्वस्तांनी केलाय. साईबाबा संस्थान आणि उत्तराखंडमधील कुटुंबाच्या कथित चमत्काराच्या दाव्यावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीने कडकडून आक्षेप घेतलाय. एवढंच नव्हे तर चमत्काराच्या दाव्यातील सत्य शोधण्यासाठी ५ नेत्रहीन भक्त तयार असल्याचं सांगत चमत्कार केल्यास अंधश्रद्धा निर्मुलन समितीने थेट २१ लाखांचं बक्षीसच जाहीर केलंय. हा प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रध्देचा प्रश्न असला तरी श्रद्धेच्या दुनियेत अनेकदा अंधश्रद्धा वरचढ ठरत असते. एकीकडे मंगळावर वास्तव्य करण्याच्या गोष्टी होत असतानाच भक्तांच्या मनावरचा अंधश्रध्देचा पगडा मात्र काही कमी होत असताना दिसत नाही.







