मुंबई : कूपरमधील निवासी डॉक्टर आणि मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर प्रशासनाने मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे कूपरमधील निवासी डॉक्टरांनी मंगळवार, ११ नोव्हेंबर रोजी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच मंगळवारी सायंकाळपासून सर्व डॉक्टर नियमित कामावर रूजू झाले.
कूपर रुग्णालयामध्ये एमएसएफ सुरक्षा कर्मचारी जास्तीत जास्त तीन महिन्यांत आणि शक्यतो १ महिन्यात तैनात केले जातील. सध्या तैनात असलेले २४ अतिरिक्त महापालिका सुरक्षा कर्मचारी एमएसएफ फोर्स प्रत्यक्षरित्या तैनात होईपर्यंत कार्यरत राहतील, असे लेखी आश्वासन मुंबई महानगरपालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. तसेच या आश्वासनांच्या प्रगतीबाबत महानगरपालिका उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) दर १५ दिवसांनी प्रगतीचे निरीक्षण करण्यासाठी मार्डसोबत बैठक घेतील, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाने स्पष्ट केल्यानंतर कूपरमधील निवासी डॉक्टरांनी संप मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. तसेच दिलेल्या मागण्यांची पंधरा दिवसांत पूर्तता न झाल्यास पुन्हा संप करण्यात येईल, असा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला.







