पालघर : पालघरच्या जव्हारमध्ये भयंकर अपघाताची घटना घडली. भरधाव रुग्णवाहिके दुचाकीला धडक देत तिघांना चिरडलं. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णवाहिका चालक दारूच्या नशेत होता. अपघातानंतर रुग्णवाहिका चालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जव्हार रूग्णालयातून एका रुग्णाला पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले होते. या रुग्णाला नाशिकला रुग्णवाहिकेतून नेले जात होते. या रुग्णवाहिकेचा चालक दारुच्या नशेत होता. जव्हार रूग्णालयातून नाशिकच्या दिशेने जात असताना चालक रग्णवाहिका वेगाने चालवत होता. त्यामुळे भयंकर अपघात झाला. जव्हार मोखाडा- नाशिक महामार्गावर रुग्णवाहिकेने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. मोखाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत निलमाती येथे ही घटना घडली. दुचाकीवरून प्रवास करणारे तिघेही रस्त्यावर पडले. त्यानंतर रुग्णवाहिका चालकाने तिथेच थांबवण्याऐवजी तिघांनाही चाकाखाली चिरडले. या अपघातामध्ये दोघांनी जागीच प्राण सोडले. तर एक जण गंभीर जखमी झाला.







