मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही मनसेने शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सवाचे आयोजन केले असून यंदा या दीपोत्सवाचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू असतानाच आता दीपोत्सवाला प्रथमच उद्धव ठाकरे हजेरी लावणार असल्यामुळे यंदाचा दीपोत्सव ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साहाचा असणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दादरच्या शिवाजी महाराज पार्कमध्ये १७ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. १७ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता या दीपोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. मनसेच्या दीपोत्सवाचे हे १३ वे वर्ष असल्याची माहिती मनसेचे उपशहर अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी दिली. तरुण-तरुणींमध्ये या दीपोत्सवाचे प्रचंड आकर्षण असून या ठिकाणी छायाचित्र काढण्यासाठी मुंबईकरांची गर्दी होत असते. या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला दरवर्षी विविध क्षेत्रातील सुप्रसिद्ध मंडळी हजेरी लावतात. यंदा या उत्सवास प्रथमच उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.







