नवी मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. बुलेट ट्रेन नवी मुंबई विमानतळाला जोडली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातला प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रेल्वे, रस्ते, हवाई मार्ग असलेल्या बुलेट ट्रेन कॉरिडॉरची निर्मिती केली जाणार आहे. प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी या कॉरिडॉर निर्मिती केली जाणार आहे. जर या प्रस्तावाला मान्यता मिळून जर बुलेट ट्रेन नवी मुंबईतील विमानतळाला जोडली गेली तर याचा प्रवाशांना चांगला फायदा होईल.
मिळलेल्या माहितीनुसार, मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडली जावी यासंदर्भातला प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर करण्यात आला आहे. यासाठी रेल्वे, रस्ते, हवाई मार्ग असलेला एक बुलेट ट्रेन कॉरिडॉर निर्माण होईल का यावर देखील सध्या चर्चा सुरू आहे. प्रवाशांचा प्रवास सुसाट आणि सुखकारक व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे. या कॉरिडॉरच्या निर्मितीमुळे प्रवासाच्या वेळेत बचत होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र रेल्वे बोर्डाकडून याबाबतच्या प्रस्तावाबाबत काहीच सांगण्यात आले नाही. पण या बाबत चर्चा सुरू असल्याचे सुत्रांनी सांगितले. या प्रोजक्टमुळे मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानच्या कनेक्टिव्हिटीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. याचसोबत बुलेट ट्रेनमुळे त्यांना नवी मुंबई एअरपोर्टवर पोहचणे सोपे होईल. पण यासंदर्भात गेलेल्या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाकडून नेमका काय निर्णय घेतला जाईल हे महत्वाचे ठरणार आहे.







