महाराष्ट्र : अंतराळाची आवड असलेल्या प्रत्येकाला नासाबद्दल आकर्षण असते. तिथे जाऊन अंतराळातील प्रयोग पाहण्याची अनेकांची इच्छा असते. पण अनेक कारणांमुळे ते शक्य नसतं. आता महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करुन दिली आहे. ‘मुख्यमंत्री विज्ञान वारी उपक्रमा’अंतर्गत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना दरवर्षी इस्रो आणि नासा दौऱ्यावर पाठवले जाणार आहे.
विज्ञान क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी योजनेअंतर्गत दरवर्षी ५१ निवडक विद्यार्थ्यांना अमेरिकेतील नासा (नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन) भेटीची संधी मिळणार आहे. शालेय शिक्षण विभागाने या योजनेला मंजुरीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधनाला चालना मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. शालेय शिक्षण विभाग तहसील, जिल्हा आणि राज्य स्तरावर विज्ञान प्रकल्प स्पर्धांचे आयोजन करतो. तहसील स्तरावरील स्पर्धेतून निवडलेल्या २१ उत्कृष्ट प्रकल्पांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या विभागातील विज्ञान केंद्राला भेट देण्याची संधी मिळणार आहे. जिल्हा स्तरावरील स्पर्धांमधून ५१ सर्वोत्कृष्ट प्रकल्प निवडून त्यांच्या विद्यार्थ्यांना बेंगलूरू येथील भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इसरो) ला भेटीची संधी मिळेल. तर, राज्य स्तरावरील ५१ अंतिम विजेत्यांना नासा भेटीचे विशेष बक्षीस देण्यात येईल.







