पुणे : पुणे शहराचा वाढता विस्तार विचारात घेऊन गृह विभागाने आणखी पाच नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली आहे. तसेच, दोन नवीन परिमंडळांच्या निर्मितीवर शिक्कामोर्तब केले आहे. लक्ष्मीनगर (येरवडा), लाेहगाव, नऱ्हे, येवलेवाडी (कोंढवा), मांजरी अशा पाच नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तलयात सध्या पाच परिमंडळे आहेत. गृह विभागाने परिमंडळ सहा आणि सात अशा दोन परिमंडळाच्या निर्मितीचा प्रस्ताव मंजूर केला आहे. नवीन पोलीस ठाणे, तसेच परिमंडळासाठी ८०० पोलीस कर्मचाऱ्यांचे मनुष्यबळ मंजूर करण्यात आले आहे.
विमानतळ पोलीस ठाण्याचे विभाजन करून लोहगाव पोलीस ठाणे, हडपसर पोलीस ठाण्याचे विभाजन करून मांजरी पोलीस ठाणे, सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे विभाजन करून नऱ्हे पोलीस ठाणे, येरवडा पोलीस ठाण्याचे विभाजन करून लक्ष्मीनगर पोलीस ठाणे, तसेच कोंढवा पोलीस ठाण्याचे विभाजन करून येवलेवाडी पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांकडून बसविण्यात आलेल्या एआय तंत्रज्ञानावर आधाारित सीसीटीव्ही कॅमेरे योजनेचे उद्घाटन महिनाभरापूर्वी मु्ख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.







