वृत्तसंस्था : काही दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने इगतपुरी मधील रेन फॉरेस्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा अड्डा छापा घालून उध्वस्त केला होता. यामध्ये त्यावेळी मुंबईतील पाच जणांना अटकही करण्यात आली होती. अटक केलेल्यांमध्ये मीरा-भाईंदर मधील दोघांचा समावेश असून या दोघांनी रायगड आणि पालघर जिल्ह्यात अशाच प्रकारे बनावट कॉल सेंटर चालवले असल्याची धक्कादायक कबुली दिल्याचे सीबीआयच्या वरिष्ठ सूत्रांकडून कळते. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे पालघर आणि रायगड जिल्ह्यात वरिष्ठ पदांवर काम करणारे दोघे पोलीस अधिकारी प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सीबीआयने इगतपुरी मधील रेन फॉरेस्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी धाड टाकून काही खासगी व्यक्तींकडून चालवले जाणारे बनावट कॉल सेंटर उध्वस्त केले होते. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून ग्राहकांच्या बँक खात्यातील पैसे उकळल्याचे उघडकीस आल्यानंतर सीबीआयने ही छापेमारी केली होती. या छाप्यामध्ये एक कोटी २० लाख रुपयांची रोकड, सात आलिशान वाहने,अर्धा किलो सोने, ४४ लॅपटॉप आणि ७१ मोबाईल जप्त करण्यात आले होते.
या प्रकरणी मुंबई आणि पालघर मधील पाच जणांना अटक करण्यात आली होती. या बनावट कॉल सेंटर मार्फत केवळ राज्यातील आणि देशातील नव्हे तर अमेरिका, कॅनडा तसेच अन्य देशातील नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे . हे रॅकेट चालवण्यासाठी ६० ऑपरेटर्सची भरती या बनावट कॉल सेंटरमध्ये करण्यात आली होती. सीबीआयच्या हाती या छाप्यामध्ये मोठे घबाड लागले असून मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवहार केल्याचे आढळून आले आहे.







