वृत्तसंस्था : चॅटजीपीटी बनवणाऱ्या ओपनएआय कंपनीच्या अडचणी वाढल्या आहेत. कॅलिफोर्नियामधील एका १६ वर्षीय मुलाने चॅटजीपीटीच्या सूचनांमुळे आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप त्याच्या पालकांनी केला. याप्रकरणी, मुलाच्या पालकांनी कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे, ज्यामुळे जनरेटिव्ह एआयच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कॅलिफोर्निया येथील १६ वर्षीय अॅडम रेनने एआय चॅटबॉट वापरून आत्महत्या केली, असा आरोप त्याचे पालक मॅट आणि मारिया रेन यांनी केला असून त्यांनी ओपनएआय विरुद्ध ४० पानांचा खटला दाखल केला आहे. पालकांच्या म्हणण्यांनुसार, अॅडम गृहपाठासाठी चॅटजीपीटीचा वापर करायचा. मात्र, त्यानंतर एआय टूलने त्याला आत्महत्येस प्रवृत्त केले. १०० टक्के खात्री आहे की, चॅटजीपीटीनेच त्याला आत्महत्या करण्यास मदत केली. चॅटजीपीटीने त्याला आत्महत्येबद्दल विचारण्यापासून रोखले नाही किंवा आपत्कालीन प्रोटोकॉल सुरू केला नाही, असाही पालकाचा आरोप आहे.







