मुंबई : मध्य रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त अतिरिक्त गर्दीचे विभाजन विविध ठिकाणी ३०६ विशेष रेल्वेगाड्या चालविण्यास सुरुवात केली आहे. तसेच लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी सह लालबाग, परळ भागात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेने मुंबईतही विशेष व्यवस्था केली आहे.गणेशोत्सवातील प्रवाशांची वर्दळ सुरळीत ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे व पनवेल स्थानकांवर वाणिज्यिक निरीक्षक नियुक्त केले आहेत. तसेच गर्दी नियंत्रणासाठी सुमारे १८० तिकीट तपासणीस कर्मचारी तैनात केले आहेत. तसेच मुंबईतील स्थानकावर गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि गणेश भक्तांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी विशेष पथक तैनात केले आहेत.
प्रवाशांना तिकिटे काढण्यासाठी जादा तिकीट खिडक्या उपलब्ध करून दिल्या आहेत. लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणीच्या दर्शनाला जाण्यासाठी गणेश भक्त करी रोड आणि चिंचपोकळी स्थानकाचा सर्वाधिक वापर करतात. त्यामुळे या स्थानकात चढणाऱ्या आणि उतरणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष सोय केली आहे. चिंचपोकळी, करी रोड, भायखळा, परळ, दादर, कॉटन ग्रीन, वडाळा रोड, ठाणे व पनवेल स्थानकांवर अतिरिक्त तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ३० मोबाइल-यूटीएस यंत्रणा वितरित केल्या आहेत. चिंचपोकळी, करी रोड, भायखळा, परळ, दादर व कॉटन ग्रीन स्थानकांवर २७ ऑगस्टपासून दहा दिवसांसाठी मोबाईल-यूटीएस व यूटीएस ॲप प्रचार पथक तैनात करण्यात येणार आहे. यासह या स्थानकांवर प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त सहाय्यक नियुक्त केले जाणार आहेत. चिंचपोकळी व करी रोड स्थानकांवर दिवसरात्र अतिरिक्त तिकीट तपासणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच या दोन स्थानकात २७ ऑगस्ट रोजीपासून प्रत्येकी दोन अतिरिक्त यूटीएस खिडक्या सुरू केल्या आहेत.







