डोंबिवली : डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागातील रस्ते, गल्ल्यांमध्ये मोटार वाहन चालक, दुचाकी स्वार मनमानी पध्दतीने वाहनतळाची सुविधा नसताना वाहने उभी करून ठेवत आहेत. त्यामुळे या भागात सतत वाहतूक कोंडी होते. रस्ते, गल्ली बोळात नियमबाह्य पध्दतीने उभी करून ठेवलेली ही वाहने वाहतूक पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भाग हा बाजारपेठेचा आहे. या परिसरात खरेदीसाठी येणारे नागरिक एक दिशा मार्ग, बस थांबे, विजेचा खांब, शाळेचा परिसर, स्वच्छतागृह यांचा आडोसा घेऊन नियमबाह्य पध्दतीने आपली दुचाकी, चारचाकी वाहने उभी करत आहेत. ही वाहने वाहतुकीला मोठा अडसर होत आहेत. ही वाहने यापूर्वी वाहतूक विभागाकडून उचलली जात होती. मोटार रस्ता अडवून उभे असेल तर त्या वाहनाच्या चाकाला सापळा (जॅक) लावून ते वाहन जखडून ठेवले जात होते. आता ई चलन पध्दतीमुळे वाहतूक पोलीस रस्ता अडवून वाहन उभे असेल तर त्या वाहनाला आहे त्या ठिकाणीच ठेऊन ई चलन पध्दतीने दंड लावत आहेत. यापूर्वी वाहन सापळा लावून जखडून ठेवले की वाहन मालकाची वाहतूक पोलीस येईपर्यंत हैराणी होत होती. आता तो प्रकार राहिला नसल्याने मोटार मालक मनमानी पध्दतीने डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागात वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा करत आहेत.







