पुणे : महापालिका शाळांतील ई लर्निंग प्रकल्प गेल्या तीन वर्षांपासून ठप्प पडला असून हा प्रकल्प सुरू व्हावा, यासाठी महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचा चित्र पाहायला मिळत आहे.
पुणे शहरातील महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी काही वर्षापूर्वी ई-लर्निंग यंत्रणा महापालिकेच्या शाळांमध्ये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी अनेक शाळांमध्ये महापालिकेने लाखो रुपयांचा निधी खर्च करून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षापासून ई-लर्निंगसाठी आवश्यक असलेल्या खर्चाला मान्यता न देण्याचे धोरण महापालिकेने स्वीकारले असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीच्या काळात खाजगी संस्थेच्या मदतीने महापालिकेच्या काही शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला. त्यानंतर महापालिकेच्या जवळपास सर्वच २६५ शाळांमध्ये ई लर्निंगची व्यवस्था उभारण्यात आली. शाळेतील सर्व वर्ग खोल्यांमध्ये स्क्रीन बसविण्यात आले असून शिक्षण मंडळाच्या मुख्य कार्यालयाद्वारे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दृकश्राव्य स्वरूपात शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यात आले.







