मुंबई : गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस उरले असून गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू झाली आहे. तसेच, गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. महानगरपालिका प्रशासनाच्या एक खिडकी योजनेअंतर्गत गणेशोत्सव मंडळांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून नुकतेच घोषित केले आहे.
मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे ऑनलाईन पद्धतीने देण्याचे नियोजन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी सोमवारपासून महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मुंबईतील हजारो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे गणेशोत्सवासाठी सार्वजनिक किंवा खासगी जागेवर मंडप उभारतात. या सर्व मंडळांसाठी महानगरपालिकेने विविध सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अवघ्या काही मिनिटांत गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीचा आणि नूतनीकरणाचा अर्ज भरण्याची सुविधा महानगरपालिकेने उपलब्ध केली आहे.




