मुंबई : विमानात धूम्रपान करणाऱ्या एका प्रवाशाविरोधात सहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नैरोबी- मुंबई प्रवासादरम्यान हा प्रकार घडला होता. इंडिगो एअरलाईन्सचे एक विमान (६ ई १८५४) शनिवार १८ जुलै रोजी नैरोबीहून मुंबईला येत होते. विमान मुंबई विमानतळावर उतरण्यासाठी दुपारी सुमारे अर्धा तास अवधी होता. त्यावेळी विमानातील एक कर्मचारी (केबीन अटेंडंट) प्राची लांडगे यांना प्रसाधनगृहात धूराचा वास येवू लागला. त्यावेळी प्रवासी ठाकोरभाई पाठक (६६) प्रसाधनगृहातून बाहेर पडताना दिसले. याबाबत त्यांनी पाठक यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी विमानात धूम्रपान केल्याचे कबुल केले. हा प्रवासी नैरोबूहीन प्रवास करीत होता. अन्य हवाई कर्मचारी (केबीन क्रू मेंबर) सिध्दी बने (३३) आणि मनिषा कांडपाल (२८) यांनीही पाठक यांच्याकडे विचारणा करून खात्री केली. या प्रकाराबाबत वैमानिक दिव्या पटोल यांना माहिती देण्यात आली.
नियमानुसार विमान सुरू होण्याआधी आणि विमान सुरू असताना विमानात धूम्रपान करण्यास बंदी आहे. तशी माहिती प्रवाशांना वेळोवेळी दिली जाते. मात्र या नियमांचा भंग करून ठाकोरभाई पाठक यांनी विमानात ध्रूमपान केले. त्याबाबत विमानातील कर्मचारी प्राची लांडगे यांनी इंडिगो एअरलाईन्सच्या वतीने विमानातील प्रसाधनगृहात धूम्रपान करून स्वत:च्या व अन्य प्रवाशाच्या जीवाला धोका निर्माण केल्याबद्दल सहार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सहार पोलिसांनी ठाकोरभाई पाठक यांच्याविरोधात विमान अधिनियमन १९३७ च्या कलम २५ आणि भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) कलम १२५ अन्वये गुन्हा दाखल केला.







