पुणे : पुणे विद्यापीठात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनास सुरवात केली आहे. विद्यापीठाचे गेट तोडून विद्यार्थी आत घुसले आहेत. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. कुलगुरुंची भेट घेण्यासाठी ते आले आहेत. निकालात घोळ असल्याचे विद्यार्थ्यांचे मत आहे. एकूण मार्काच्या फक्त दहा टक्के ग्रेस असतो तर ५० मार्काच्या पेपरला जो पाच मार्काचा ग्रेस मिळाला पाहिजे तर एका विद्यार्थिनीला नऊ मार्क्स आहेत तरीसुद्धा तिला ग्रेस देऊन २० मार्क्स केलेले आहेत ११ मार्क्स वाढवलेले आहेत. अशा विविध मुद्द्यांवरून विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. शेकडो विद्यार्थी विद्यापीठात ठिय्या आंदोलन करत आहेत. आमची पुन्हा परीक्षा घ्या अशी मागणी विद्यार्थ्यानी केली आहे. विद्यापीठाच्या गेटवर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. विद्यर्थ्यांना आतमध्ये प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यानी विद्यापीठाचे गेट तोडून आत प्रवेश केला आहे. आमच्या निकालामध्ये घोळ झाला असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. विद्यापीठाचे कुलगुरू खाली येऊन आमचे निवेदन अथवा आमच्या मागण्या मान्य करत नाहीत, तोवर आम्ही हटणार नाही असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार निकाल प्रक्रियेत अनियमितता, चुकीचे ग्रेस मार्क्स, रिव्हॅल्युएशन आणि फोटोकॉपी प्रक्रियेत गोंधळ आणि निकालामधील बदलांमुळे विद्यार्थ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे. अमरावती विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांना ‘कैरी ऑन’चा दिलासा दिला असताना, पुणे विद्यापीठ मात्र अद्याप निर्णय घेण्यात अपयशी ठरत आहे. त्यामुळे पुणे विद्यापीठाने देखील तत्काळ री-एग्जाम जाहीर करून विद्यार्थ्यांचं वर्ष वाचवावं, ही प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींची विद्यापीठ प्रशासनाशी बैठक झाली. यामध्ये कुलगुरूंनी विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घेत सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं असून, दोन दिवसांत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असं स्पष्ट केलं. प्र-कुलगुरू सध्या युजीसी अध्यक्षांची भेट घेण्यासाठी दिल्लीमध्ये असल्याची माहिती देण्यात आली. जर दोन दिवसांत विद्यार्थ्यांच्या हिताचं योग्य पाऊल उचलण्यात आलं नाही, तर आंदोलन अधिक तीव्र होईल आणि बेमुदत उपोषण सुरू केलं जाईल, असा स्पष्ट इशारा एन.एस.यू.आय आणि विद्यार्थी काँग्रेसकडून देण्यात आला आहे. या आंदोलनात एन.एस.यू.आयचे माजी राष्ट्रीय सचिव अक्षय जैन, विद्यार्थी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भूषण रानभरे, तसेच यूट्यूबवरील ‘आलसी इंजिनीयर’ चॅनेलचे रोनक खाबे आणि अन्य प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.







