मुंबई : राज्यात आरोग्य सेवा अधिक जलद गतीने मिळण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच आता आरोग्य विभागाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी ग्रामीण व शहरी भागात लोकसंख्यानिहाय आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी काटेकोर नियोजन करावे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देऊन आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशा महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. विधानभवन येथे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश कुमार यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘नागरी क्षेत्रातील आरोग्य प्रकल्पांची कामांसाठी प्रत्येक पालकसचिवांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखून या कामांना गती द्यावी. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देऊन आपले सरकार संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात याव्यात’, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘राज्यातील प्राथमिक आरोग्यसेवा मजबूत करून ग्रामीण भागाप्रमाणे शहरात देखील प्राथमिक आरोग्य केंद्राची संख्या वाढवावी. नवीन रुग्णवाहिकांसाठी करण्यात येणारे करार, ३९८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि २८०६ उपकेंद्रांचे आधुनिकीकरण करण्यासाठीची ५९८३ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, हा निधी टप्प्याटप्प्याने मिळणार आहे. राज्य शासन तसेच वित्तीय संस्थाकडून मिळणाऱ्या निधीच्या खर्चाचे योग्य नियोजन करा’. तसेच, केंद्र शासनाच्या आरोग्य योजना व राज्यातील आरोग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे. प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी विभागाने काढलेल्या नवीन मार्गदर्शक सूचना लवकर वितरीत करण्यात याव्यात. नवीन पायाभूत सुविधा विकास महामंडळाची स्थापनेबाबत सर्व कार्यवाही गतीने करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.







