मुंबई : अस्सल मराठमोळा उत्सव अशी ओळख असलेल्या दहीहंडी उत्सवाला साहसी क्रीडा प्रकाराचे स्वरुप देण्यात येत असून त्यानिमित्ताने प्रो – गोविंदाच्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र यंदा प्रो गोविंदा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांना परराज्यांतील शहरांची नावे देण्यात आल्याबद्दल गोविंदांनी नाराजीचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, यंदा प्रथमच मराठमोळ्या गोविंदा पथकांना दिल्ली, सुरत, जयपूर, बंगळूरू, हैदराबाद, गोवा, वाराणसी, लखनऊ या शहरांचीही नावे देण्यात आली आहेत.
‘प्रो – गोविंदा’ स्पर्धेचे पहिलेवहिले पर्व २०२३ साली पार पडले होते. त्यानंतर या रोमहर्षक स्पर्धेला नवीन स्वरूप देत दुसऱ्या पर्वापासून म्हणजेच २०२४ पासून गोविंदा पथकांच्या संघांसाठी व नावांसाठी संघ बोली कार्यक्रमालाही सुरुवात झाली होती. गतवर्षी अंतिम फेरीत पोहचलेल्या सर्वच्या सर्व महाराष्ट्रातील १६ गोविंदा पथकांना महाराष्ट्रातील विविध शहरांची नावे देण्यात आली होती. मात्र यंदा राज्याबाहेरील दिल्ली इगल्स, सुरत टायटन्स, जयपूर किंग्स, बंगळूरू ब्लेझर्स, हैदराबाद डायनामोज, गोवा सर्फर्स, वाराणसी महादेव असेंडर्स, लखनऊ पँथर्स अशी नावे देण्यात आली आहेत. यंदा पथकांना महाराष्ट्रातील ८ शहरे आणि राज्याबाहेरील ८ शहरांची नावे देण्यात आली आहेत.







