मुंबई : बंदी असतानाही ड्रोन कॅमेऱ्याद्वारे अंधेरीत चित्रिकरण करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी ड्रोन चालकासह तिघाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर खबरदारी म्हणून सर्वच शहरात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ नुसार ड्रोन, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आदी साधनांचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनीही भारतीय नागरिक सुरक्षा अधिनियमाअंतर्गत शहरात ५ जून २०२५ ते ४ जुलै २०२५ या कालावधीत ड्रोन, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आदींच्या वापरास बंदी घातली आहे. पोलिसांनी प्रसिध्द केलेल्या आदेशानुसार ड्रोन, रिमोट नियंत्रित मायक्रो लाईट, एअरक्राफ्ट, पॅरामोटर, हँगग्लायडर, हॉट एअर बलून कुणालाही उडवता येत नाही. शुक्रवारी संध्याकाळी ४ च्या सुमारास अंधेरी पूर्व येथील सेंट्रल रोडवरील सिप्झ कंपनीच्या प्रवेशद्वार क्रमांक १ जवळ ड्रोन उडविण्यात येत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या दहशतवाद विरोधीत पथकाला (एटीसी) मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिघांना ताब्यात घेतले. सिनोव्हेटीव्ह कंपनीत मोहम्मद सनी (२७) ड्रोन ऑपरेटर म्हणून काम करतो. त्याच्या कंपनीला एलीगंट बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स कंपनीने चित्रिकरणाचे काम दिले होते.
कंपनीचे अन्य कर्मचारी स्वप्नील देसाई (३२) सोनुकुमार रॉय (२६) घटनास्थळ दाखवण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी तेथे हजर होते. पोलिसांनी ड्रोन साहित्य जप्ते केले असून या तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३ (५) आणि कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भविष्यात संघर्ष झाल्यास ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मानवी जीवन धोक्यात न आणता रिअल-टाइम इंटेलिजन्स, पाळत ठेवणे आणि लष्करी निरीक्षण, अचूक हल्ले आणि शत्रूची अस्त्रे नष्ट करणे आदी गोष्टींसाठी तुलनेने ड्रोनचा मोठा उपयोग होतो. त्यामुळे सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्याच्या दृष्टीने ड्रोन, एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर आदींचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे मुंबई पोलिसांनी सांगितले.







