ठाणे : सरपटणारे मोठे प्राणी शक्यतो जंगलात आढळून येतात. त्यातच अजगराचे नाव जरी ऐकले तरी अंगावर काटा येतो. परंतु ठाण्यातील एका भागात तब्बल आठ फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने नागरिकांची भंबेरी उडाली. शहर म्हटले की उंच-उंच इमारती, वाहनांची वर्दळ आणि नागरिकांची गर्दी पण या काँक्रीटच्या जंगलात जर एकाएकी ‘अजगर’ नजरेस पडला तर कोणाच्याही अंगावर काटा येणारच ना, अगदी असेच काहीसे दृश्य ठाण्यात पाहायला मिळाले. जेव्हा एका नाल्यात तब्बल आठ फूट लांबीचा अजगर आढळून आला. हा अजगर पाहताच परिसरातील नागरिकांच्या अंगावर काटा आला. काहींनी भीतीपोटी नाला परिसरातून ये-जा करणे टाळले, तर काहींनी मोबाईल कॅमेरे काढून हा थरारक प्रसंग चित्रीत केला.
सावरकरनगर येथील आ.जे. ठाकूर महाविद्यालाजवळील एका नाल्यामध्ये मंगळवारी सकाळी ११.३२ वाजता हा अजगर आढळून आला. हा अजगर आठ फूट लांबीचा असून तो एका व्यक्तीला दिसला. याची माहिती प्राणी प्रेमी संस्थेला मिळाल्यानंतर वाईल्ड वेल्फेअर असोसिएशनचे स्वयंसेवक (डब्यूडब्यूए), ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नाल्यामध्ये अडकलेल्या अजगराची सुखरूप सुटका केली. तसेच अजगराला संस्था कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.






