मुंबई : मुंबईत मेट्रोचं जाळं वेगानं विस्तारत असताना आणखी एक महत्त्वाची मेट्रो लाईन प्रवाशांच्या सेवेत येण्याची चिन्हं दिसत आहेत. मुंबई महापालिकच्या निकालानंतर एक नवीन मेट्रो सेवेत येणार आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मुंबईकरांना एक खास भेट मिळण्याची शक्यता असून, MMRDA कडून अर्धवट सुरू असलेली मेट्रो मार्गिका पूर्ण क्षमतेनं सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून महापालिका निवडणुका पूर्ण होताच मेट्रो २B आणि मेट्रो ९ सुरू करण्यात येतील, असं आश्वासन देण्यात येत होतं. मंडाळे ते डायमंड गार्डन जोडणारी मेट्रो २B आणि दहिसर ते काशिगाव जोडणारी मेट्रो ९ या मार्गिकांचं उद्घाटन डिसेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होतं. मात्र, महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. आता निवडणुका पार पडल्याने या मेट्रो मार्गिकांच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा झाला आहे. दहिसर ते सुभाष चंद्र बोस स्टेडियम जोडणाऱ्या टप्प्याचं काम पूर्ण झालं असून, ही मेट्रो २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनी प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.







