डोंबिवली : डोंबिवली पूर्व भागात ठाकुर्ली खंबाळपाडा भागात राहत असलेल्या एका १६ वर्षाच्या मुलीचे तिच्या मामाच्या मुलाबरोबर प्रेम होते. या प्रेमाला मुलीच्या कुटुंबीयांकडून विरोध केला जात होता. आपण ठरविलेल्या मुलाबरोबर आपले लग्न होणार नसल्याचा विचार करून या अल्पवयीन मुलीने मंगळवारी दुपारी खंबाळपाडा येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येप्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांकडून टिळकनगर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली आहे. मयत मुलगी तिचे वडील, आई आणि भाऊ असे कुटुंब डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा भागात राहते. मुलीचे वडील व्यावसायिक आहेत. या मुलीचा भाऊ नोकरी करतो. आई गृहिणी आहे.
पोलीस ठाण्यातील नोंदीत मुलीच्या वडिलांनी म्हटले आहे, की आपली सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी गेल्या सहा महिन्यांपासून तिच्या मामाच्या मुला बरोबर सतत मोबाईल आणि इन्स्टाग्रामवर संपर्कात होती. या मुलीचा मामा कल्याण जवळील म्हारळ गावात राहतो. या सततच्या बोलण्याने मुलीचे कुटुंबीय त्रस्त होते. मी लग्न करीन तर मामाच्या मुलाशीच, अशी ती हट्टाने आणि आग्रहाने म्हणायची. परंतु, मुलीच्या वडिलांनी मयत मुलीला मामा मुलगा चांगला नाही. त्याला नोकरी नाही. तसेच तू अद्याप सोळा वर्षाची आहे. तुझे अजून लग्नाचेही वय झाले नाही. त्यामुळे तू उगाच लग्नासाठी हट्ट धरू नकोस. आई, वडिलांनी सांगुनही अल्पवयीन मुलगी आपल्या मतावर ठाम होती. मी लग्न करीन तर मामाच्या म्हारळ येथील मुलाशीच असा तिचा आग्रह कायम होती. या तिच्या विचाराला घरातून कुटुंबीय विरोध करत होते. लग्न करायचे तर सुस्थितीत असलेल्या मुलाशी. त्याला नोकरी, व्यवसाय पाहिजे, असे त्यांचे मत होते. पण मुलगी कुटुंबीयांचे ऐकण्यास तयार नव्हती. आपले लग्न आपल्या मामाच्या मुलाबरोबर कुटुंबीयांच्या विरोधामुळे होणार नाही. ते आपल्या लग्नाला सतत विरोध करत राहतील असा विचार करून अल्पवयीन मुलीने मंगळवारी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.





