वृत्तसंस्था : भारतीय महिला कुस्तीपटू मनीषा भानवाला हिने जागतिक कुस्ती स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत भारताला अभिमानास्पद क्षण दिला आहे. महिलांच्या ५९ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात तिने अमेरिकेच्या अबीगेल नेट हिचा ८-६ अशा रोमांचक फरकाने पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. या विजयासह मनीषा जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे. विशेष म्हणजे अंतिम सामन्यात ती सुरुवातीला ०-६ अशा पिछाडीवर होती. मात्र, अविश्वसनीय जिद्द, संयम आणि आक्रमक खेळाच्या जोरावर तिने दमदार पुनरागमन करत सामना आपल्या बाजूने फिरवला आणि सुवर्णपदक पटकावले. या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय महिला कुस्तीला जागतिक स्तरावर नवे स्थान मिळाले असून, देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
मनीषा भानवाला ही जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी दुसरी भारतीय कुस्तीपटू ठरली आहे. यापूर्वी २०१० मध्ये सुशील कुमार यांनी पुरुषांच्या ६६ किलो वजनी गटात विश्वविजेतेपद मिळवले होते. तब्बल १६ वर्षांनंतर भारताच्या नावावर पुन्हा जागतिक कुस्तीचे सुवर्ण आले असून, महिलांच्या गटात हा पहिलाच पराक्रम ठरला आहे. यंदाच्या स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनीही उल्लेखनीय कामगिरी केली. नीलम सिरोही (५० किलो) आणि काजल धोचक (७६ किलो) यांनी अंतिम फेरी गाठत रौप्यपदके जिंकली, तर तनुमू शर्मा हिने कांस्यपदकाची कमाई केली. एका जागतिक स्पर्धेत प्रथमच तीन भारतीय महिला अंतिम फेरीत पोहोचल्याने भारतीय महिला कुस्तीच्या प्रगतीचा नवा अध्याय लिहिला गेला आहे. अंतिम फेरीपूर्वी मनीषाने कझाकस्तानच्या अल्टीन शागायेवा हिच्यावर एकतर्फी विजय मिळवत आपली दावेदारी सिद्ध केली होती. त्यानंतर अंतिम सामन्यातील ऐतिहासिक पुनरागमनाने तिने केवळ सुवर्णपदकच जिंकले नाही, तर भारतीय क्रीडा इतिहासातही आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले.
