वसई : वसई क्राईम ब्रँच युनिट-१ ने मोठी कारवाई करत मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मुंबईच्या दिशेने नेल्या जात असलेल्या बनावट चलनी नोटांचा मोठा साठा जप्त केला आहे. शिरसाट फाटा पुलाखाली सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत ५०० रुपयांच्या तब्बल २० हजार बनावट नोटा हस्तगत करण्यात आल्या असून, त्यांची दर्शनी किंमत एक कोटी रुपये इतकी आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून बनावट नोटांचे जाळे आणि पुरवठा साखळीबाबत सखोल चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात या बनावट नोटांचा साठा सुमारे ३० लाख रुपयांत विकण्याचा व्यवहार ठरल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातमधून मुंबईकडे येणाऱ्या संशयित कारची तपासणी करताना एका बॅगेत मोठ्या प्रमाणावर ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. त्यानंतर नोटांची मोजणी करण्यात आली असता त्यांची दर्शनी किंमत तब्बल एक कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले. या कारवाईमुळे पोलिसांनी मोठा आर्थिक गुन्हा उघडकीस आणला असून, या प्रकरणामागे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या बनावट नोटांची गुणवत्ता, त्यावरील सुरक्षा वैशिष्ट्ये आणि त्या नेमक्या कुठे तयार करण्यात आल्या याची तांत्रिक तपासणी केली जाणार आहे. संशयिताकडून मिळणाऱ्या माहितीनुसार या नोटा तयार करणारे, त्यांचा पुरवठा करणारे आणि बाजारात चलनात आणण्याचे काम करणारे वेगवेगळे घटक कार्यरत आहेत का, याचाही तपास सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा साठा गुजरातमधून मुंबईकडे आणला जात असल्याने या संपूर्ण प्रकरणामागे गुजरात कनेक्शन आहे का, याचाही शोध पोलिस घेत आहेत. बनावट नोटा ३० लाख रुपयांत विकण्याचा व्यवहार नेमका कोणाशी होणार होता, त्यामागील मुख्य सूत्रधार कोण आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, याचा तपास क्राईम ब्रँचकडून युद्धपातळीवर सुरू आहे. संशयिताच्या चौकशीतून बनावट चलनी नोटांच्या पुरवठ्याची संपूर्ण साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, या कारवाईमुळे राज्यात कार्यरत असलेल्या मोठ्या बनावट चलनी नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.






