मुंबई : महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची ओळख केवळ राज्य किंवा देशापुरती मर्यादित न राहता ती आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक प्रभावीपणे पोहोचावी, यासाठी आधुनिक मार्केटिंग, डिजिटल ब्रँडिंग आणि प्रभावी प्रचारावर विशेष भर देण्याच्या सूचना पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षातील मार्केटिंग व ब्रँडिंग कामकाजाचा आढावा तसेच २०२६-२७ च्या कृती आराखड्याबाबत सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश गटणे, पर्यटन संचालनालयाचे संचालक मंगेश जोशी, उपसचिव संतोष रोकडे, उपसचिव विजय पोवार, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, सहसंचालक संतोष जाधव, सहाय्यक संचालक रवींद्र पवार, सहाय्यक संचालक सुशील पवार, कार्यकारी अभियंता आकाश चकोर यांच्यासह इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीत २०२५-२६ या आर्थिक वर्षात राबविण्यात आलेल्या विविध मार्केटिंग व ब्रँडिंग उपक्रमांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच आगामी २०२६-२७ या वर्षासाठी पर्यटन प्रचार, प्रसार, डिजिटल माध्यमांचा अधिक प्रभावी वापर, नाविन्यपूर्ण विपणन संकल्पना आणि राज्यातील पर्यटन क्षेत्राची व्यापक प्रसिद्धी करण्यासाठी आखण्यात येणाऱ्या कृती आराखड्यावर सखोल चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना अधिक व्यापक प्रसिद्धी मिळावी आणि देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
यावेळी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्राची समृद्ध पारंपरिक खाद्यसंस्कृती, लोकपरंपरा, कला, सांस्कृतिक वारसा आणि ऐतिहासिक वैभव यांचा प्रभावी प्रचार करण्याच्या सूचना दिल्या. राज्याची वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन ओळख देश-विदेशातील पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी डिजिटल ब्रँडिंग, सामाजिक माध्यमे आणि आधुनिक प्रचार मोहिमांचा अधिक परिणामकारक वापर करण्यावर त्यांनी भर दिला. महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी पर्यटन विभाग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्य करून विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नियोजनबद्ध मार्केटिंग, नाविन्यपूर्ण प्रचार उपक्रम आणि जागतिक दर्जाच्या डिजिटल मोहिमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पर्यटन ब्रँडला अधिक बळकटी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील नैसर्गिक, ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळांचा व्यापक प्रचार करून अधिकाधिक देशी व विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. पर्यटन क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासकीय यंत्रणांमधील समन्वय, प्रभावी अंमलबजावणी आणि आधुनिक विपणन धोरणांचा अवलंब केल्यास महाराष्ट्राची पर्यटन क्षेत्रातील ओळख जागतिक स्तरावर अधिक सक्षम आणि प्रभावी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.






