पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमात पुणे जिल्ह्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. मतदारयादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्याच्या उद्देशाने ३० जून ते २९ जुलै या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील ९० लाख ८० हजार १७३ मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जात आहे. यासाठी ८ हजार ४१७ मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) आणि विविध राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) कार्यरत आहेत. ही प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि अचूक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आझम कॅम्पस येथील पुणे वाणिज्य, विज्ञान आणि कला महाविद्यालय तसेच सेंट मीरा महाविद्यालय येथील प्रत्येकी १५० विद्यार्थ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे. जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या माहितीनुसार, या विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे मतदार पडताळणीचे काम अधिक प्रभावीपणे पार पडत आहे.
मोबाईल ॲप आणि संगणकीय प्रणालीचे ज्ञान असलेले विद्यार्थी बीएलओंना गणना अर्जांचे वितरण, माहिती संकलन, डिजिटल नोंदणी आणि इतर तांत्रिक कामांमध्ये सहाय्य करत आहेत. याशिवाय, विद्यार्थी बीएलओंसोबत घरोघरी जाऊन मतदार पडताळणी प्रक्रियेतही सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यामुळे मतदारयादी पुनरीक्षणाचे काम अधिक कार्यक्षम आणि वेगवान होत असल्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील मतदारयादी अधिक अचूक आणि परिपूर्ण करण्यासाठी इतर महाविद्यालये, शिक्षण संस्था आणि राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) स्वयंसेवकांनीही या विशेष पुनरीक्षण मोहिमेत सहभागी व्हावे, तसेच इच्छुक विद्यार्थ्यांनी बीएलओंना सहकार्य करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे.






