मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अनारक्षित (Unreserved) डिजिटल तिकिटांबाबत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. अनेक प्रवासी RailOne अॅपवरून तिकीट बुक केल्यानंतर ते WhatsApp वर दुसऱ्या मोबाईलवर पाठवतात किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवून प्रवास करतात. मात्र भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे की, RailOne अॅपवरून बुक केलेल्या अनारक्षित तिकिटांसाठी काही विशिष्ट अटी लागू असून त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास प्रवाशांना दंडासह अन्य कारवाईलाही सामोरे जावे लागू शकते. रेल्वेच्या माहितीनुसार, RailOne अॅपवरून बुक केलेले अनारक्षित तिकीट केवळ ज्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आणि ज्या मोबाईल डिव्हाइसवर ते बुक करण्यात आले आहे, त्याच डिव्हाइसवर वैध मानले जाईल. त्यामुळे तिकीट दुसऱ्या मोबाईलवर WhatsApp द्वारे पाठवून दाखवणे, त्याचा स्क्रीनशॉट वापरणे किंवा इतर कोणत्याही माध्यमातून शेअर केलेली प्रत दाखवणे ग्राह्य धरले जाणार नाही. तिकीट तपासणीदरम्यान डिजिटल तिकिटाची पडताळणी मूळ नोंदणीकृत मोबाईलवरच केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासादरम्यान तिकीट बुक केलेला तोच मोबाईल आणि संबंधित नोंदणीकृत क्रमांक सक्रिय स्थितीत सोबत ठेवणे आवश्यक आहे.
याशिवाय, प्रत्येक प्रवाशाने प्रवासादरम्यान वैध फोटो ओळखपत्र जवळ बाळगणेही अनिवार्य आहे. आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट किंवा शासनाने मान्य केलेल्या इतर कोणत्याही वैध ओळखपत्राचा वापर करता येईल. तिकीट तपासणीदरम्यान तिकीट तपासनीस (TTE) प्रवाशाच्या नोंदणीकृत मोबाईलवरील डिजिटल तिकीट आणि फोटो ओळखपत्र या दोन्हींची पडताळणी करू शकतात. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट बुक केल्यानंतर केवळ स्क्रीनशॉट किंवा फॉरवर्ड केलेल्या प्रतीवर अवलंबून न राहता मूळ अॅपमधील तिकीटच दाखवावे आणि आवश्यक ओळखपत्र सोबत ठेवावे. या नियमांचा उद्देश डिजिटल तिकिटांचा गैरवापर रोखणे, बनावट तिकिटांवर नियंत्रण ठेवणे आणि तिकीट पडताळणीची प्रक्रिया अधिक सुरक्षित व पारदर्शक करणे हा आहे. त्यामुळे रेल्वेने जारी केलेल्या या सूचनांचे पालन करूनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.






