मुंबई : विनोदी कलाकार प्रणित मोरे यांच्या कार्यक्रमातून चर्चेत आलेल्या ‘३७० रुपयांच्या बिर्याणी’ प्रकरणाने आता नवे वळण घेतले असून या चर्चेत मुंबई पोलिसांनीही सहभाग नोंदवला आहे. समाजमाध्यमांवर जनजागृतीसाठी उपरोधिक आणि समकालीन विषयांवर पोस्ट करणाऱ्या मुंबई पोलिसांनी ‘संमती’ या महत्त्वाच्या विषयावर एक विशेष इन्स्टाग्राम पोस्ट प्रसिद्ध केली आहे. या पोस्टमध्ये पांढऱ्या पार्श्वभूमीवर मोठ्या अक्षरांत ‘₹३७०’ हा आकडा दाखवण्यात आला असून ‘०’ या अंकाच्या जागी बिर्याणीच्या ताटाचे चित्र वापरण्यात आले आहे. त्यासोबत “₹३७० मध्ये तुम्हाला बिर्याणीची एक प्लेट मिळते. आमच्या कोठडीत जास्त वेळ घालवल्यास मोफत जेवण मिळते,” असा संदेश देण्यात आला आहे. तसेच #BiryaniIsNotConsent हा हॅशटॅग वापरत कोणाचेही नाव न घेता संमतीबाबत स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. “ही तुमची निवड आहे,” असे नमूद करत मुंबई पोलिसांनी व्यक्तीच्या संमतीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या पोस्टनंतर समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली असून अनेकांनी पोलिसांच्या जनजागृती मोहिमेचे स्वागत केले आहे.
दरम्यान, या प्रकरणाची सुरुवात प्रणित मोरे यांच्या स्टँड-अप कार्यक्रमातील एका व्हायरल झालेल्या ‘क्राउड वर्क’ व्हिडीओमुळे झाली होती. या व्हिडीओमध्ये एका प्रेक्षकाने एका महिलेसोबत बाहेर गेल्यानंतर चिकन बिर्याणीवर ३७० रुपये खर्च केल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर केलेल्या एका वक्तव्यामुळे समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी हे विधान महिलांविषयी चुकीची मानसिकता दर्शवणारे आणि संमतीच्या संकल्पनेला कमी लेखणारे असल्याची टीका केली. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या पोस्टला अनेकांनी योग्य वेळी दिलेला सामाजिक संदेश असे म्हटले आहे. काही वापरकर्त्यांनी मात्र पोलिसांनी अशा वादांमध्ये विनोदी शैलीचा वापर करू नये, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर अनेकांनी “नाही म्हणजे नाही” या तत्त्वाचा पुनरुच्चार करत महिलांच्या निवडीचा, मर्यादांचा आणि गोपनीयतेचा आदर करण्याची गरज अधोरेखित केली. संमती ही कोणत्याही नातेसंबंधात किंवा व्यवहारात गृहीत धरता येत नाही, हा संदेश या संपूर्ण चर्चेतून पुन्हा एकदा ठळकपणे समोर आला आहे.







