पालघर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सुलभ व्हावे आणि त्यांच्या स्वप्नांना नवी उभारी मिळावी यासाठी The Giving Tree Foundation या समाजसेवी संस्थेने एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. ‘१०० सायकली, १०० स्वप्ने’ या मोहिमेअंतर्गत पालघर जिल्ह्यातील विक्रमगड आणि वाडा तालुक्यातील विद्यार्थ्यांना सायकली तसेच शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. या भागातील अनेक विद्यार्थ्यांना दररोज ८ ते ९ किलोमीटरचा पायी प्रवास करून शाळेत जावे लागते. खडतर प्रवासामुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि ऊर्जा मोठ्या प्रमाणात खर्च होते. ही समस्या लक्षात घेऊन संस्थेने विद्यार्थ्यांना सायकली उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. वसई-विरार तसेच आसपासच्या शहरांमध्ये वापराविना पडून असलेल्या जुन्या सायकली दान करण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. जमा झालेल्या सायकलींची दुरुस्ती करून त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जाणार आहेत. या मोहिमेसाठी २१ जूनपर्यंत सायकल दान करता येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या उपक्रमासोबतच विक्रमगडमधील उधळे विभाग हायस्कूल आणि वाड्यातील के. जी. पाटील स्कूलमधील इयत्ता ८ वी ते १० वीच्या सुमारे ६५० विद्यार्थ्यांना विविध शालेय साहित्य पुरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी दप्तर, ग्रंथालयासाठी पुस्तके, शैक्षणिक साहित्य, शालेय गणवेश तसेच क्रीडा साहित्य दान करण्याचे आवाहनही संस्थेकडून करण्यात आले आहे. “एका लहानशा मदतीने आपण एखाद्याचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो,” असा संदेश देत नागरिकांनी सढळ हस्ते या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे संस्थापक Vinay Ware यांनी केले आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नागरिकांनी ९७३०८९८६८३ किंवा ८३९०९१५७१७ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.







