ठाणे : ठाणे शहरातील क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाबाबत निर्माण झालेल्या शंकांना उत्तर देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेला प्रत्यक्ष गती मिळाल्याचे स्पष्ट केले. ठाणे महापालिका आणि सिडको यांच्या माध्यमातून क्लस्टर प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झाली असून, शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचा सरकारचा ठाम निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘क्रेडाई-एमसीएचआय ठाणे’तर्फे आयोजित मालमत्ता प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते. १९ एप्रिलपर्यंत सुरू असलेल्या या प्रदर्शनात बोलताना त्यांनी ठाण्याच्या पायाभूत सुविधांमध्ये होत असलेल्या मोठ्या बदलांवरही प्रकाश टाकला. पूर्वी अरुंद असलेला घोडबंदर मार्ग आता रुंद करण्यात आला असून, शहरात मेट्रो प्रकल्पाचे कामही वेगाने सुरू आहे. मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ३३७ किमी मेट्रो जाळे उभारले जात असून, यामुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
याशिवाय ठाणे शहरात अंतर्गत मेट्रो मार्गिका विकसित केली जात असून ती मुख्य मेट्रो नेटवर्कला जोडली जाणार असल्याची माहितीही शिंदे यांनी दिली. मुंबई-ठाणे परिसरात पॉड टॅक्सी प्रकल्पही राबवण्यात येत असून, आधुनिक वाहतूक सुविधांमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होईल, असे त्यांनी नमूद केले. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी खाडी किनारी मार्गिका प्रकल्पाचे काम सुरू असून, हा मार्ग शहराबाहेरून जाणार असल्याने ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ठाणे शहरातील हरितपट्टे महत्त्वाचे असल्याचे सांगत, दरवर्षी एक लाख वृक्ष लागवड करण्याचे निर्देश महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर क्रेडाई-एमसीएचआय सारख्या संस्थांनीही वृक्षलागवडीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.







